युक्रांद राज्य अधिवेशन

२० फेब्रुवारी २०११

    स्थळ गांधीभवन पुणे

अधिवेशनात संमत झालेले ठराव

1. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन

गेल्या काही वर्षात भांडवलदार वर्ग शासनाच्या मार्फत गावातील जमिनी, पाणी, जंगल नष्ट करून त्यावर आपला कब्जा मिळवू पाहत आहे. नैसर्गिक साधना संपत्तीचा विचारपुर्वक वापरा करून येथील सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत.पर्यावरणाचे संवर्धन व्हायला पाहिजे या दृष्टीने नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराचे निर्णय गावपातळीवर सामुदायिकरीत्या व्हायला हवे. वाळू, खनिज, इंधन, संपत्ति, जंगलातील दूर्मिळ वनस्पती व वृक्ष यांचे भू माफीया टोळ्यापासून संरक्षण होणे गरजेचे आहे. जल, जंगल, जमीन याचा विचारपूर्वक वापर करून पर्यावरणाच्या संवर्धनाचा दृष्टीकोन ठेवून 'चिरंतन विकास' करण्याच्या प्रयत्नात व आपापल्या परिसरातील राहीवाशांचे आपल्या भागातील जल, जंगल, जमिनीशी असलेल्या जैविक नात्याच्या हक्कासाठीच्या आंदोलनाच्या पाठीशी आणि बरोबरीने युक्रांद सहभागी राहील.
सूचक: श्री. संपतराव पवार                           अनुमोदक श्रीराम टेकाळे

२. भ्रष्टाचारविरोधातील लढा

 शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याचा भ्रष्टाचार निपटून टाकण्यासाठीच्या विविध पातळीवरच्या प्रयत्नात युक्रांद सहभागी होईल. कधी स्वतंत्रपणे तर कधी इतर संघटनाच्या सहकार्याने युक्रांद सत्याग्रही पद्धतीने जनआंदोलन उभारील. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी युक्रांद सातत्याने प्रयत्नशील राहील.
सूचक: डॉ. चंद्रशेखर मेश्राम                           अनुमोदक श्री. रविंद्र धनक 

३. खोट्या अस्मितेच्या विरोधातील राजकारण

प्रांतिक व स्थानिक अस्मितेच्या नावावर वाढत्या गुंडगिरीबद्दल युक्रांदला चिंता वाटत आहे. नियमाप्रमाणे होणाऱ्या नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्ये अडथळे आणतात. त्यामुळे स्थानिक सत्ताधारी शासनाचे निर्णय अंमलात येत नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणसेवक भरतीसाठी गेलेल्या तरुण-तरुणींना स्थानिक मंत्र्यांच्या हस्तक्षपामुळे नोकरीवर रुजू होता आले नाही. या प्रश्नांवर युक्रांदचे आंदोलन सुरु असून संधी नाकारले गेलेले शिक्षणसेवक या लढ्यात अग्रभागी आहेत. महाराष्ट्र शासनाने अशाप्रकारे जिल्हावाद व तालुकावाद निर्माण करून शासकीय कारवाईत अडथळे निर्माण करणाऱ्यांना कठोरपणे बाजूला सारून तरुणांना न्याय मिळवून द्यावा असा ठराव हे अधिवेशन करीत आहे.
सूचक: श्री. संदीप बर्वे                           अनुमोदक एड. प्रवीण नाईक

४. साखर कारखाना भ्रष्टाचार आंदोलन

शेतकऱ्यांच्या उसाला वेळेवर पैसे न देणाऱ्या भ्रष्ट साखर संचालकांच्या विरोधात कठोर कारवाई करून संचालकांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा असा ठराव युक्रांदच्या या अधिवेशनात संमत करण्यात येत आहे.
सूचक श्री. विकास लवांडे                         अनुमोदक श्री. वसंत गरकळ

 

५.  ट्युनिशिया आणि ईजिप्तमधील जनआंदोलन

ट्युनिशिया व इजिप्तमध्ये जनआंदोलनाच्या रेट्यापुढे सत्ताधिशांना शरण येउन सत्तेवरून पायउतार व्हावे लागले याचा युक्रांदला आनंद होत आहे. जनआंदोलनाचे लोण इतर देशातही पसरू लागल्याने विविध देशातील भ्रष्ट सत्ताधीश धास्तावले आहेत. ट्युनिशिया व इजिप्तमध्ये शस्त्रनिरपेक्ष, शांततापूर्ण पण आक्रमक निदर्शनाला आलेले यश हे महात्मा गांधीनी दाखवलेल्या शांततापूर्ण मार्गाने प्रतिकार करण्याच्या संघर्ष प्रणालीचे यश आहे. जगातल्या विविध देशातील व आपल्या भारत देशातील सत्ताधीश या जनआंदोलनापासुन धडा घेतील अशी आशा हे अधिवेशन व्यक्त करीत आहे.
सूचक कीर्ती गुणाले                                 अनुमोदक आस्मा पठाण

3. सार्कदेशांतर्गत शस्त्रास्त्रस्पर्धेला विरोध

जगातील सर्व विकसनशील व अविकसित देशातील सर्वसामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविण्यास निधी अपुरा पडत असताना शस्त्रास्त्रे व अन्य युद्धासामुग्रीवर अनेक देश मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहेत. शेजारील देशांबरोबरचे आपल्या मतभेदाचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविता येतात असा आमचा विश्वास आहे. भारताचे आपल्या देशांबरोबरचे शांतता टिकवण्याची प्रक्रिया गतिमान करावी आणि दक्षिण आशियाई देशाची युद्ध आणि तणाव यापासून मुक्ती करावी अशी युक्रांदची भूमिका आहे.दक्षिण आशियातील सर्व सामान्य जनतेचा आपसातील संवाद वाढविण्याच्या शासकीय व अशासकीय प्रयत्नात युक्रांद सहभागी आहे.
सूचक अन्वर राजन                               अनुमोदक एड. मीरा डोईफोडे

4. स्त्रिया, दलित व अल्पसंख्याकावरील अत्याचार

माजामध्ये स्त्रिया, अल्पसंख्याक, दलित व आदिवासींवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. प्रशासन, शासन, पोलीस व न्यायालय या संस्था अशाप्रकारच्या घटनांविषयी पुरेसे संवेदनशील नसल्याचे दिसते. समाजातल्या या दुर्बल घटकांच्या पाठीशी युक्रांद कायमच आहे. संपूर्ण समाज भयमुक्त व्हावा यासाठी युक्रांद सदैव प्रयात्नाशील राहील.
सूचक एड. गोपाळ गुणाले                               अनुमोदक भाग्यश्री कापुरे

5. शिक्षणाचा मुलभूत हक्क

भारतातील शिक्षणाचा प्रश्न अवघड बनविला जात आहे. ६ ते १४ वयोगटातील प्रत्येकास मोफत व सक्तीचे शिक्षन मिळेल असा कायदा झाला. पण त्यासाठी अनुरूप व्यवस्था करण्यात सरकारला यश आले नाही. बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व सर्वांपर्यंत मोफत पोचवण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने उपलब्ध करून द्यायला हवा. पण गंगा उलटी वाहत आहे. शासन आपली जबाबदारी झटकुन खासगी शैक्षणिक संस्थांना मोकळे रान उपलब्ध करून देत आहे. नफेखोरीचा हेतू असलेल्या खासगी शाळाकॉलेजचे उदंड पीक आलेले आहे. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. भरमसाठ फी घेणाऱ्या आणि अत्यावश्यक सुविधांचा अभाव असलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करीत आहेत. ज्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा करावी ते सत्ताधीश व विरोधी पक्षाचे अनेक नेते शिक्षसम्राट म्हणून समाजा����� उंच मानेने वावरत आहेत. खासगी अभिमत विद्यापीठांची वाढती संख्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यास समर्थ आहे असे दिसत नाही. जगातल्या पहिल्या ५०० विद्यापीठापैकी भारतातील एकही शासकीय वा खासगी विद्यापीठाचा समावेश नसावा ही शरमेची गोष्ट आहे. म्हणून युक्रांदचे हे अधिवेशन अशी मागणी करत आहे की
१. बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण सर्वाना मोफत उपलब्ध व्हावे व शैक्षणिक गुणवत्ता सर्वांगाने उंचावण्याची सरकारने योग्य ती उपाययोजना करावी.
२. खासगी शाळा व महाविद्यालयाच्या फी आकारणीवर व गुणवत्तापूर्ण शिक्षणांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी प्रामाणिक तज्ञाची कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करावी.
३. शासनाने आपल्या अंदाजपत्रकापैकी शिक्षणांवर किमान ६% खर्च करावा. कोणत्याही शैक्षणीक मंडळातील अंदाजपत्रकीय तरतूद केली जावी. तसेच झालेली तरतूद १००% वापरण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.
४. मराठीसह प्रादेशिक व मातृभाषेतून शिक्षण देऊन इंग्रजी ही भाषा म्हणून उत्तम प्रकारे येईल यासाठी तरतूद करावी.
५. भारतीय संविधानातील मूल्ये सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा अंतर्भाव अभ्यासक्रमात करावा.
६. शिक्षणव्यवस्था, गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वशिक्षा अभियान या सर्वच गोष्टी भ्रष्टाचार व मध्यस्थांच्या आक्रमणामुळे उध्वस्त होऊ लागल्या आहेत. भ्रष्टाचार व मध्यस्तापासून शिक्षणव्यवस्था मुक्त करावी.
७.स्थानिक, बेजबाबदार राजकीय पुढाऱ्यांचा शैक्षणीक कारभारात हस्तक्षेप चिंताजनक आहे.शासनाने आणि प्रशासनाने या पुढार्यांसमोर नांगी न टाकता खंबीरपणे आपले योग्य निर्णय अमलात आणावेत.
सूचक डॉ. उर्मिला सप्तर्षी                               अनुमोदक प्रा. पंडीत तुपे

 ९. इतिहासाचे विकृतीकरण

समाजात वंदनीय असणाऱ्या महामानवाना जात, धर्म व राज्यांच्या चौकटीत अडकवणाऱ्या शक्तींपासून समाजाला धोका आहे. आजच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इतिहासाकडून धडा घेणे आवश्यक आहे. इतिहासाचे विकृतीकरण टाळणे आवश्यक आहे. अन्यथा त्यातून सामाजिक उद्रेक संभवतात. तथापि इतिहासातील प्रेरणादायी प्रतिमांच्या बुरख्याखाली राडेबाजी करणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांना युक्रांदचा कायम विरोध असेल. समानता, मानवता या मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या या महामानवांना जात, धर्म आणि कोणत्याही संकुचित चौकटीत अडकवण्याच्या प्रवृत्तीचा युक्रांद तीव्र निषेध करते. सर्व महापुरुषांचा जातिधर्मनिरपेक्ष भावनेने आदर केला जावा ही युक्रांदची ठाम भूमिका आहे.
सूचक संपतराव साबळे                               अनुमोदक प्रा. कविता म्हेत्रे

या सर्व बाबींसाठी युक्रांद प्रयत्नशील राहील.

ठराव पीडीएफ स्वरुपात येथे उपलब्ध आहेत.