परिवर्तनवादी युवक संमेलन

२६ फेब्रुवारी २०१२

    स्थळ गांधीभवन पुणे


महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेले परिवर्तनवादी युवक संमेलन २६ फेब्रुवारी २०१२ रोजी उत्साहात पार पडले.

 

महात्मा गांधीचे पणतू व विचारवंत तुषार गांधी, आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे, गुजराथमध्ये शांतता व मानवी हक्कांसाठी काम करणारे विनय महाजन व चारूल भरवाडा हे दाम्पत्य हे संमेलनाचे प्रमुख अतिथी होते.

राज्यघटनेच्या प्रास्ताविकेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संयोजन समिती सदस्य कीर्ती गुणाले हिने प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत ' महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त अन्वर राजन आणि संदीप बर्वे एड. गोपाल गुणाले, कीर्ती गुणाले, विकास लवांडे, अतिक शेख या संयोजन समिती सदस्यांनी केले. युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी' आणि 'युवक क्रांती दला'ची संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका त्यांनी विशद केली. आपल्या देशात जन्मावर आधारीत भेदभाव मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याला विरोध करणारी श्रमण परंपरा मानणारया तरुणांना संघटीत करण्यासाठी हे संमेलन आहे असे सांगून या संमेलनासाठी करण्यात आलेला राज्यव्यापी दौरा आणि संमेलनानंतरच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

यानंतर विनय महाजन आणि चारूल भरवाडा यांनी मानवी हक्क, समानता या विषयांवरची अत्यंत प्रभावी गीते सादर केली. हे जोडपे गुजराथमध्ये मानवी हक्क आणि शांततेसाठी समर्पितपणे काम करीत आहे. त्यांच्या गीतांना उपस्थितांनीही भरभरून दाद दिली. विनय महाजन यांनी आपल्या मनोगतात महत्वाचे विचार व्यक्त केले. ताजमहाल कोणी बांधला असा प्रश्न विचारल्यावर आपण शहाजहानने असे उत्तर देतो. मात्र खरया अर्थाने ताजमहाल बांधणार्या कामगारांना आपण विसरतो असे त्यांनी नमूद केले. आपल्या कामादरम्यान आलेले अनुभवही महाजन यांनी सांगितले. महाजन आणि भरवाडा यांच्या कामाची विस्तृत ओळख अन्वर राजन यांनी करून दिली.

यानंतर प्रतिभा शिंदे यांनी  उपस्थितांशी संवाद साधला. चळवळीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुण एकत्र येणे ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची घटना असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेतले तरुणही या कामात सहभागी होतील, अशी घोषणाही त्यांनी केली. आज समाजातील प्रश्न जटील होत असताना त्यावर 'तरुणांची संघटीत शक्ती' हेच उत्तर असल्याने अशा संमेलनाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

तुषार गांधी यांनी आपल्या भाषणात उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. आपल्याला भाषणापेक्षा येथे जमलेल्या तरुणांशी संवाद साधण्यात अधिक रस असल्याचे ते म्हणाले. सध्या सर्वत्र बंडखोरीचे वातावरण आहे. 'ओक्युपाय वोल स्ट्रीट' सारखी चळवळ आपल्या देशात सुरु होणे महत्वाचे आहे. तरुणांनी 'साड्डा  हक्क' बजावला पाहिजे. प्रत्येक खटकणाऱ्या गोष्टीला प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्न विचारणे ही परिवर्तनाची सुरुवात असल्याचे नमूद करून आजच्या संमेलनातून अशा बंडखोरांची संख्या वाढायला हवी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ' मी गांधींचा पणतू आहे. त्यांच्यासारखे कपडे घालत नाही. म्हणून माझ्यावर टीका होते.  महामानवाप्रमाने कपडे घातल्याने कुणी महामानव बनत नाही. त्यांचे विचार आचरणात आणावे लागतात. असेही गांधी यांनी सांगितले.

संमेलनाच्या उदघाटनाच्या सत्राचा अध्यक्षीय समारोप `महाराष्ट्र गांधी स्मारक निधी' आणि 'युवक क्रांती दलाचे' अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला. या संमेलनाच्या माध्यमातून हजारो सत्याग्रही तरुण तयार व्हावेत आणि महात्मा गांधी व श्रमण परंपरेतल्या सर्व महामानवानी सुरु केलेली ही बंडखोरीची साखळी पुढे प्रभावीपणे चालू रहावी अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली. १९६७ साली 'युवक क्रांती दल' संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर अन्यायाविरोधात सत्याग्रहाच्या मार्गाने संघर्ष करून महाराष्ट्रातल्या किमान एक लाख तरुणांनी कारावास पत्करला असे ही ते म्हणाले. सत्याग्रहाचे महत्व सांगताना या सत्याग्रहशास्त्रासारखा प्रभावी मार्ग दुसरा नाही. हे शास्त्र तरुणांनी आत्मसात करावे असे त्यांनी सांगितले. आण्णा हजारेंच्या आंदोलनाने देशभरात सकारात्मक उर्जा निर्माण केली. मात्र आंदोलनात अनेक दोषही होते. समाजामध्ये, विशेषत: तरुणांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीनी जगाला दिलेल्या सत्याग्रही मार्गाबद्दल संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून अनेकांची टीका सहन करीत मी या आंदोलनाचे विश्लेषण माध्यमातून केले असे त्यांनी नमूद केले. या संमेलनातून सत्याग्रही मार्गाबद्दल जिद्यासा असणारे तरुण पुढे आले तर आपल्याला सत्याग्रहाची माहिती द्यायला आवडेल असे त्यांनी आवर्जून सांगितले.

भोजनानंतर झालेल्या दुसरया सत्रामध्ये एड. गोपाल गुनाले, प्रा.डॉ. नंदा पाटील, विकास लवांडे या संयोजन समिती सदस्यांनी विचार व्यक्त केले. युक्रांदचे कार्य करताना समाधान, आनंद, आणि सामाजिक कामाला समाजाकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद याबद्दल तिघांनी विचार मांडले. आपल्या वैयक्तिक जीवनात आपण केवळ करीअरचा विचार करीत होतो मात्र युक्रांदमुळे आयुष्यात सकारात्मक बदल झाला. जीवनाचा अर्थ गवसला असे गुणाले यांनी सांगितले. या संमेलनासाठी फिरताना बहुसंख्य समाज संघर्षमय जगण्यामुळे जीवनाचा अर्थ गमावून बसल्याचे लक्षात आल्याचेही ते म्हणाले. गावाचा सरपंच बनून ग्रामविकासाचे काम करताना सत्याग्रहामध्ये सहभागी होताना पराकोटीचे समाधान मिळत असल्याचा अनुभव विकास लवांडेने सांगितला. तर आपल्या ईच्छेप्रमाणे आयुष्याचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आजही समाजात नसून ' ऑनर किलींग'च्या घटना वाढत असल्याचा मुद्दा डॉ. नंदा पाटील यांनी उपस्थित केला. यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. तुषार गांधी यांनी तरुणांनी विचारलेल्या प्रश्नाना तपशीलवार उत्तरे दिली.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी संमेलनाचा अध्यक्षीय समारोप केला. संमेलनातून परिवर्तनाची चळवळ महाराष्ट्रात मजबूत व्हावी यासाठी तरुणांनी जयप्रकाश नारायण यांचे संपूर्ण क्रांतीचे तत्वज्ञान समजून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. कीर्ती गुणाले यांनी उपस्थिताकडून परिवर्तनाची शपथ घेतली. या शपथेने संमेलनाचा समारोप केला.

संमेलनाला पुणे, नाशिक, अहमदनगर, लातूर, बीड, परभणी, नागपूर, अमरावती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या आणि ईतरही काही जिल्ह्यातील तरुण सहभागी झाले होते. सर्वांना नावनोंदणी अर्जाबरोबर युक्रांदची मुलभूत भूमिका देण्यात आली.

२७ फेब्रुवारीला निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत संमेलनाबाबतचा अभिप्राय सर्वांनी सांगितला. आपापल्या गावामध्ये युक्रांदचे केंद्र स्थापन करणे आणि महाराष्ट्रातल्या पन्नास हजार परिवर्तनवादी तरुणांची डिरेक्टरी तयार करण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला. त्यापैकी सुमारे सात हजार तरुणांची माहिती संमेलनासाठी झालेल्या दौर्यातून गोळा करण्यात आली आहे. आता नवीन शैक्षणिक वर्षामध्ये राज्यभरातील महाविद्यालयानचा दौरा करून उर्वरीत बेचाळीस हजार तरुणांची माहिती गोळा केली जाणार आहे. आपल्या संपर्कात असे परिवर्तनवादी तरुण असल्यास आपण त्यांची माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड, पुणे-३८ या पत्त्यावर पाठवावी ही विनंती.